Thursday, February 25, 2021

नारायणगावकरांच्या गळ्यातील ताईत कै.रमणकाका माळवदकर ..!भावपूर्ण श्रद्धांजली!

कै.रमेश दत्तात्रय माळवदकर (रमणकाका)
बालपणीच्या काळापासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे वय वर्षे ७४ पर्यंत खडतर, संघर्षमय आयुष्य. मनमिळावू, भोळा, विनम्र, सतत कार्यमग्न आणि पहिल्याच भेटीत सर्वांना आपलं करणारा स्वभाव ! याच स्वभावामुळे प्रचंड दांडगा अगदी घराघरात जिव्हाळ्याचा-आपुलकीचा संपर्क, सर्वांसोबत स्नेहाचे संबंध, प्रेम. बहीण भावंडापासून ते सर्व नातेवाईकांमध्ये-जनमाणसांत प्रसिद्ध, नारायणगावकरांच्या गळ्यातील ताईत म्हणजे सर्वांचे लाडके रमणकाका माळवदकर ..!
          सुरुवातीपासूनच ज्येष्ठ बंधू कै. गजानन (भाऊ) माळवदकर यांच्या खांद्याला खांदा लावून भाऊंच्या सावलीसारखे त्यांच्या बरोबरीने रमणकाका उभे राहिले, बरोबरीने कष्ट केले. शेवट पर्यंत भाऊंचा शब्द हिच पूर्व दिशा मानून त्यांची अखंड सेवा केली. नारायणगावातील हनुमान चौक येथील ‘रमेश सुईंग मशीन कं.‘ च्या माध्यमातून अखंडपणे शिवणकाम केले. त्याकाळात अगदी फोटोवरून कोट, जॅकेट, शर्ट-पँट तसेच ब्लाऊजचे काकांनी अनेक वर्षे शिवणकाम केले.
             समाजसेवेची आवड जोपासताना, अनेकांची लग्ने जमवताना, अनेकांना नोकरी-धंद्याला जोडताना, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होताना अंतःकरणातून असलेली अध्यात्माची आवड सुद्धा काकांनी जोपासली. यामध्ये ‘हनुमान देवस्थान ट्रस्ट, हनुमान चौक‘ येथे कै. मुरलीधर (नाना) डेरे, श्री. बबन कानडे आणि तमाम सहकाऱ्यांच्या बरोबरीने तब्बल २५ वर्षे खजिनदार, उपाध्यक्ष ही पदे यशस्वीरित्या भूषविली. या माध्यमातून अतिशय चोख कारभाराद्वारे हनुमान देवस्थानची प्रामाणिकपणे, निस्पृहरित्या अखंड सेवा केली. तसेच ‘हरिस्वामी देवस्थान‘ च्या अगदी सुरुवातीच्या संस्थापक कमिटीमध्ये हिरीरीने संचालक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. उत्सवासाठी असणाऱ्या वर्गण्या असो वा देवस्थानच्या खोल्यांचे भाडे असो सर्व व्यवहार अगदी चोख पद्धतीने काकांनी पार पाडला. तसेच नारायणगाव पंचक्रोशीतील सर्वांची गुरुमाऊली परम पूजनीय अनंतघोष उर्फ मौनी बाबाजी हे रमणकाकांच्या गुरुस्थानी होते. त्याकाळात श्री. भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथे रमणकाका हे दिवाबत्ती करायला जात होते, तेव्हा त्याठिकाणी मौनी बाबाजी असताना बाबाजींना रमणकाका भजन ऐकून दाखवायचे. त्याचप्रमाणे तेव्हाच्या गावातील मंडळांच्या गणेशोत्सवात रमणकाकांचा आरती गायनात प्रामुख्याने सहभाग होता. हे सर्व सुरू असताना खऱ्या अर्थाने रमणकाकांच्या जीवनाला साथ मिळाली २ गोष्टींची. पहिली म्हणजे त्यांची पत्नी श्रीमती रजनी रमेश माळवदकर (वय ६८ वर्षे). खांद्याला खांदा लावून रमणकाकांची अखंड आयुष्यभर साथ दिली. संघर्षमय जीवनात मागे वळून न पाहता, येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना, प्रत्येक संकटांना न हटता-न थांबता तोंड दिले.
जन्मतःच समाजसेवेची आवड असणाऱ्या रमणकाकांना दुसरी साथ मिळाली ती LIC ची. रमणकाकांनी चरितार्थाचे क्षेत्र सुद्धा असे निवडले की, ज्यामध्ये अहोरात्र, अखंडरुपी, खऱ्या अर्थाने समाज सेवा करता येईल. समाजसेवेरुपी हाती घेतलेल्या LIC एजंटच्या कार्यात रमणकाकांनी आपल्या आयुष्यातील सन १९८५ पासूनची आजतागायत तब्बल ३५ वर्षे अविरतपणे वाहिली. या सर्व कार्यात काकांना त्यांचे विकास अधिकारी श्री. शांताराम शेलार साहेब तसेच इतर विकास अधिकारी श्री. डी डी डोके साहेब, काकडे साहेब व बाकी सर्व विकास अधिकारी, एजंट, आणि ऑफिस कर्मचाऱ्यांचे प्रचंड योगदान मिळाले. त्या काळात रमणकाका हे पहिल्या वहिल्या ५ एजंट पैकी एक होते. फक्त LIC एजंट असताना त्यांनी ३ मुलींची शिक्षणं, त्यांची लग्न तसेच मुलगा ओमकार याचे शिक्षण हे सर्व पार पाडले. मुलगा ओमकार याच्या भविष्यासाठी रमणकाकांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यांच्या कष्टामुळेच ओमकार हा आज एक यशस्वी उद्योजक असून त्याने गेल्या १५ वर्षांपासून 'स्वरसंजीवन' नावाचा स्वतःचा, उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिला अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओ यशस्वीपणे नावारुपास आणला आहे.
समाजसेवा, अध्यात्म, LIC चे कार्य सुरू असताना रमणकाकांनी तत्कालीन सरपंच व काकांचे परमस्नेही मा. श्री. भीमराव खैरे, इरिगेशनचे श्री. जाधव साहेब तसेच श्री. के टी भोर यांच्या सहकार्याने खोडद रोड येथील बंधाऱ्याचे काम व अनेक रस्त्यांची कामे सुद्धा यशस्वीरित्या पार पाडली.
          आयुष्यभर खडतर संघर्ष असताना सुद्धा नेहमी आनंदाची उधळण करणाऱ्या रमणकाकांचे ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, ३ मुली, १ मुलगा, सून आणि नातवंड आहेत.
         जी हृदयात राहत होती ती एक मूर्ती होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एक मूर्ती होती,
ती पवित्र मूर्ती म्हणजे 'रमणकाका'..!
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झालो आहोत.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना..!
        "शून्यातून विश्व नमुनी अमर जाहले तुम्ही जीवनी"
         स्वर्गीय 'रमणकाका माळवदकर' यांना ग्राहक समाचार परिवाराच्या वतीने भावपूर्ण 
श्रद्धांजली..! ओम शांती !

जुन्नर तालुक्यातील घटना : मित्राच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करणाऱ्यास LCB कडून अटक

किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा कडून अटक
        नारायणगाव पो.स्टे गु.र.नं ३८/२०२०१ भा.द. वि कमल ३०७  दि.२५/२/२०२१ रोजी  पारगाव येथे खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याला एक इसम गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती सदर चा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीचा लवकर शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांकडुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
       त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पारगाव तर्फे आळी ता जुन्नर परिसरात आरोपीचा शोध घेत असताना एक इसम संशयित रित्या फिरताना मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवा उडवि ची उत्तरे दिली.त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्याचे *नाव नामदेव तिरसिंग भिल्ल उर्फ मोरे मूळ राहणार जळगाव सद्या राहणार पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर, जि.पुणे* असे सांगितले.
        त्याच्याकडे घडलेल्या गुन्ह्या बद्दल विचारपूस केली असता त्याचा मित्र इसम नामे सचिन प्रकाश जाधव मूळ रा जळगाव सद्या राहणार पारगाव तर्फे आळी ता जुन्नर यास दगडाने मारहाण करून जखमी केले बाबत कबुली दिली आहे. त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासा कामी नारायणगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक सो श्री अभिनव देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंदार जवळे सो यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सपोनि श्री नेताजी गंधारे स पोनी दत्तात्रय गुंड प्रभारी अधिकारी नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली  
स. पो.नि श्री पृथ्वीराज ताटे
पोहवा श्री विक्रम तापकीर
पोना श्री दिपक साबळे
पोशी श्री संदीप वारे
पोशी श्री निलेश सुपेकर
पोशी श्री अक्षय नवले  
  पोना. दिनेश साबळे आणि संतोष दुपारघुडे नेमणूक नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच पोलीस मित्र प्रसाद (अप्पा) पिंगळे. यांनी केली आहे

Saturday, January 30, 2021

झाडे लावा झाडे जगवा !ऑक्सिजन'ची खरी गरज आहे हे कोरोना कालावधीत पाहायला मिळाले - भास्करराव पेरे पाटील


झाडे लावा झाडे जगवा !ऑक्सिजन'ची खरी गरज आहे हे कोरोना कालावधीत पाहायला मिळाले - भास्करराव पेरे पाटील
       
   नारायणगाव(विशेष प्रतिनिधी) दि.३० माणसाला खरी ऑक्सिजनची गरज आहे.
कोरोना महामारी कालावधीत औषधांपेक्षाही ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याची
उदाहरणे आहेत,म्हणून झाडे लावली पाहिजे.
झाडे लावली तर आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळू शकतो. असे मत पाटोदा( जि. औरंगाबाद) ग्रामपंचायत'चे माजी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील  यांनी नारायणगाव 
ग्रामपंचायत व व समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रत व्यक्त केले.
  जुन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत व पंचायत राज याविषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई समाज मंदिर कार्यालय येथे करण्यात आले होते.
          या वेळी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी,हिवरे तर्फे नारायणगाव,
गुंजळवाडी,खोडद,निमदरी,येडगाव,आर्वी, मांजरवाडी, उदापूर व इतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
                   राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण मांजरे,समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे,उपाध्यक्ष आशिष माळवदकर,
सचिव राखी रत्नपारखी,हर्षल मुथ्था, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई माळवदकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे,
स्थानिक उपसरपंच सौ.सारीकाताई डेरे,आरीफभाई आतार,संतोष दांगट,संतोष पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, माजी सरपंच ज्योतिताई दिवटे,ग्रामपंचायत सदस्या सौ. आश्विनीताई ताजणे,सौ.सुप्रियाताई खैरे,रुपालीताई जाधव,सौ.मनिषाताई मेहेत्रे,सौ.पुष्पाताई आहेर,सौ.कुसुमताई शिरसाठ,सौ.संगीताताई खैरे,सदस्य गणेश पाटे,राजेश बाप्ते,रामदास अभंग ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
   पेरे पाटील म्हणाले की,प्रत्येक खात्याची तपासणी झाली पाहिजे,तपासणी झाल्यास आढावा घेतल्यास,त्या संस्थेचा ताळेबंद समजू शकतो!करण्यासारखं भरपूर काही आहे!मात्र इच्छाशक्ती पाहिजे असे सुरुवातीला सांगून,ते पूढे म्हणाले की,१)पिण्याचे पाणी स्वच्छ वापरले पाहिजे २) सांडपाणी जमिनीत जिरविले पाहिजे,किंवा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे ३) मुलांना शिक्षण दिले जावे! ४) झाडे लावली पाहिजे ५) अनाथांना,निराधार व्यक्तींना मोफत जेवण दिले पाहिजे.
             माणसाचे आयुष्य का कमी झाले या विषयावर बोलतांना पेरे पाटील म्हणाले की,माणसाला मोकळा श्वास अर्थात ऑक्सिजन घेण्यासासाठी माणसाकडे वेळ नाही!सर्वत्र घुसमट निर्माण झाली आहे.जमीन आहे तितकीच आहे मात्र लोकसंख्या वाढली आहे.त्यामुळे झाडे लावण्याऐवजी तोडली जात आहेत.झाडे लावा झाडे जगवा!हा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला!झाडे नसल्याने ऑक्सिजन कमी झाला आहे.झाडे असतील तर ऑक्सिजन वाढेल!पाटोदा या आमच्या गावात रस्त्याने लोकं नारळ तोडून खातात,झाडे लावा आणि त्यातही फळ झाडे लावा! आम्ही आमच्या गावात यंदा आणखी एक प्रयोग केला तो म्हणजे वेल (भोपळा,दोडके,कारले)अशा भाजीपाला साठी वेल लावले!आहेत.
             महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हे सांगितले आहे.संत सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी!असे का ? म्हटले,तुमची इच्छा असेल तर खूप काही करता येऊ शकते असा संदेश संतांची उदाहरणे देऊन पेरे पाटलांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात नारायणगावकरांची माने जिंकली!ग्रामसेवक कपिला गाय आहे!त्यांच्या पोटात तेहतीसकोटी देव आहेत.त्यांच्याशी वाद घालून कामे करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेऊन कामे केली पाहिजे! काम करणारालाच नावे ठेवली जातात!परंतू लोकांची नाडी ओळखा आणि कामे करा!आम्ही तेच केले.तुम्हीही करा!असा संदेशही नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी दिला!
         पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर साहेब यांनी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीसाठी कामधेनू योजना राबविली आणि काय फायदा झाला,यावेळी चाळीस ग्रामपंचायतींची निवड केली होती. त्यातून ग्रामस्थांना काय फायदा झाला हे सांगितले!
        सौ.राखी रत्नपारखी यांनी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांचा परिचय करून दिला!
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर आणि हेमंत कोल्हे यांनी केले!आभार लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Wednesday, January 27, 2021

मेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान


मेहबूब काझी यांना स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार प्रदान
जयहिंद नॅशनल क्लबच्या 26 व्या वर्धापन दिन प्रसंगी झाले पुरस्कार वितरण 

           नारायणगाव येथील शैक्षणिक कार्यकर्ते मेहबूब काझी यांना जयहिंद  नॅशनल क्लब यांच्या वतीने ' 'शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार' देण्यात आला.जयहिंद नॅशनल  क्लबच्या 26 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर आणि युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला अशी माहिती जयहिंद नॅशनल क्लबचे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली.  
         याप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव खैरे, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव 
नेहरकर,जि.प. माजी सदस्या राजश्री बोरकर, शरद बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव,  जयहिंद पोलीटेक्निक कॉलेजचे सचिव विजय गुंजाळ,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर,  युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज  वाजगे,विक्रम भोर, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष दीपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, देवेंद्र कोराळे, बबन गुळवे, आशिष माळवदकर, संतोष वाजगे,डॉ.मिलिंद कसबे,मोबीन शेख,सादीक आतार,हरिश्चंद्र नरसुडे,शिवाजी घोलप, सुनील ढवळे, राहुल  नवले, शेखर शेटे, अतुल आहेर, शोभना पोखरकर दत्ता जाधव,किरण वाजगें,जयेश कोकणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
          नारायणगाव व परिसरातील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी तसेच सामाजिक आणि सहकार सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी जयहिंद समूहाच्या वतीने दिला जाणारा ' शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्काराचे प्रथम मानकरी म्हणून मेहबूब काझी यांची निवड करण्यात आली.
        तसेच सरपंच सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश बाबू पाटे, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पदी नियुक्त झालेले माऊली खंडागळे व  विकास दरेकर, युवारत्न  पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरज वाजगे, आदर्श ग्राम निर्मिती अभियान समिती सदस्य निवडीबद्दल विक्रम भोर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध कवी व संपादक प्रदीप निफाडकर यांनी '  'यशस्वी जीवनाची आदर्श तत्व ' या विषयी व्याख्यान दिले.
          याप्रसंगी आमित बेनके मेहबूब काझी,  गुलाब नेहरकर,डॉ.वर्षा गुंजाळ,  विकास दरेकर, विक्रम भोर  यांचीही भाषणे झाली.
       कार्यक्रमाचे नियोजन धर्मेंद्र गुंजाळ, अशोक चाळक, छगन पटेल, अमित अडसरे,राहुल खेबडे, श्रीकृष्ण ताम्हाणे, नितीन औटी व सर्व सदस्यांनी केले. 
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद लंबे यांनी केले व सूत्रसंचालन सुनील मेहेर व ज्ञानेश्वर औटी यांनी केले. उपस्थितांचे आभार जितेंद्र गुंजाळ यांनी मानले.

Monday, January 25, 2021

जुन्नर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २९ जानेवारीला

जुन्नर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २९ जानेवारीला
  नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील ५ मार्च २०२० ते ४ मार्च २०२५ मधील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.२९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वा . पासुन जिजामाता सभागृह ( पंचायत समिती जुन्नर ) ता.जुन्नर , जि.पुणे येथे सोडत पद्धतीने काढण्यात येणार आहे.अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
             जुन्नर तालुक्यातील १४२ ( ४७ आदिवासी व बिगर आदिवासी ९५ क्षेत्रातील ) ग्रामपंचायतीच्या दि .५ मार्च २०२० ते दि.४ मार्च २०२५ या कालावधीसाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि.२९ जानेवारी २०२१ रोजी आयोजीत करणेकामी मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत आदेशीत करणेत आलेले आहे . प्रस्तुत आरक्षण हे दि .२९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वा . पासुन जिजामाता सभागृह ( पंचायत समिती जुन्नर ) ता.जुन्नर , जि.पुणे येथे सोडत पध्दतीने काढण्यात येणार आहे.
            सदरचे आरक्षण हे दि .५ मार्च २०२० ते दि .४ मार्च २०२५ या कालावधीत यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या सरपंच पदाकरीता लागू राहिल .
        सदर आरक्षण सोडतीच्या प्रथम सत्रामध्ये अनुसूचित क्षेत्रातील ४७ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाईल . तदनंतर उर्वरित ९५ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काढण्यात येईल .

Saturday, January 23, 2021

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नारायणगाव शहराच्या सोलर लाईट पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

नारायणगाव ग्रामपंचायत येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
जयंतीनिमित्त ग्रामपंचायतच्या सोलर लाईट पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न 
नारायणगाव - स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत ईमारत १३ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा जि.प.सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, पं.स.सदस्य दिलीप गांजाळे,ग्रामविकास अधिकारी नाईकडे साहेब,लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे यांसह ज्येष्ठ नागरिक व  पत्रकारांच्या हस्ते संपन्न झाला.
          नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
             यावेळी सरपंच योगेश पाटे  की, या सौरऊर्जा प्रकल्पवार नारायणगाव गावठाण हद्दीतील स्ट्रीट लाईट चालणार असून दर महिन्याला येणार्‍या जवळपास १ लाख रुपये बिलात सुमारे ५० ते ६० टक्के बचत होणार आहे. तर ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे १० ते १५ हजार रुपयांचे बिल देखील वाचणार असुन या बचत झालेल्या पैशाचा सद्पयोग गावच्या विकासासाठी करता येणार असुन ग्रामपंचायत पातळीवरचा हा सर्वात मोठा स्ट्रिटलाईट व इमारत सौरउर्जा प्रकल्प असल्याची माहिती देत स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
                 यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की, नारायणगाव  ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गॅस शवदाहिनी, पाणी पुरवठा योजना, भव्य गार्डन, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवरचा सर्वात मोठा सोलर प्रकल्प असे अनेक पथदर्शी प्रकल्प राबवले जात असुन सरपंच योगेश पाटे यांच्या अधिपत्याखाली नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार केला जातोय ही कौतुकाची बाब आहे. यापुढच्याही काळात अधिक चांगल्या पद्धतीने गावचा विकास होईल यात शंका नाही अशा शब्दांत आशाताई यांनी ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
यानिमित्तानं सरपंच योगेश पाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच उपसरपंच सारिकाताई डेरे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले.

                 यादरम्यान पत्रकार अमर भागवत यांच्या संकलनातुन ग्रामपंचायतच्या कार्यगौरव दिनदर्शिकेचा व प्रा.अशफाक पटेल यांच्या अखिल मराठी युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उपस्थित म‍ान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
                 याप्रसंगी अरविंद ब्रम्हे, संतोषनाना खैरे, आशिष माळवदकर, अॅड.राजेंद्र कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
                    याकार्यक्रमाला जि.प.सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्यचे संचालक संतोषनाना खैरे, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अनिल खैरे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर खळदे, मारुती फुले, रोहिदास तांबे, अरविंद ब्रम्हे, मंगल चिंतामणी, उद्योजक अभय कोठारी, किसन डेरे, अॅड.कुलदिप नलावडे, अॅड.राजेंद्र कोल्हे, पत्रकार सुरेश वाणी, रविंद्र कोल्हे, संजय थोरवे, अतुल कांकरिया, अमर भागवत, मंगेश पाटे, प्रा.अशफाक पटेल, योगेश रायकर, धनंजय माताडे, किशोर वारुळे, जितु आंद्रे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ शिवसैनिक पत्रकार मित्र,  ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
                  या सोलर लोकार्पण  सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.अशफाक पटेल यांनी केले. सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे यांनी तर आभार लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Tuesday, January 19, 2021

टाकळी हाजी ता. शिरूर येथील गोळीबार खुन प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी

टाकळी हाजी ता. शिरूर येथील गोळीबार खुन प्रकरणातील दोघे आरोपी ताब्यात : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
       
          दिनांक १८/०१/२०२१ रोजी १२.०० वा. चे सुमारास मौजे टाकळी हाजी मळगंगा हॉटेलचे पाठीमागे  वाळु व्यवसायाचे तसेच उसने पैशाचे कारणावरून  स्वप्नील छगन रणसिंग वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे याचा आरोपी नामे १)विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे २)आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे दोघे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे व इतर यांनी संगनमत करून होंडा शाईन मोटार सायकलवर येवुन पिस्तुलमधन गोळया झाडुन खुन केला व स्वप्नील सुभाष गावडे यास गोळी मारून जखमी केले. याबाबत मयत स्वप्नील छगन रणसिंग वय २४* याचे पत्नीने दिलेले फिर्यादीवरून शिरुर पो.स्टे. गु.र.नं. ४२/२०२१ भादंवि क .३०२, ३०७, १२०(ब), ३४ आर्म ॲक्ट क.३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
      सदर गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास मा.पोलीस अधीक्षक सो. यांचे आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली LCB  पथकाने करून गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे - 
१) विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे वय २५ वर्षे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे 
२) आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे वय २४ वर्षे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे यांना मौजे शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौक येथून ताब्यात घेतलेले आहे .
       सदर दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
       सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली  सपोनि. पृथ्वीराज ताटे,
सपोनि. नेताजी गंधारे,पोसई. अमोल गोरे,
सफौ. दत्तात्रय गिरमकर,सफौ. राजेंद्र थोरात,
सफौ. दत्तात्रय जगताप,सफौ. शब्बीर पठाण,
पोहवा. विद्याधर निचित,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. विक्रम तापकीर,पोहवा. जनार्दन शेळके,पोहवा. काशिनाथ राजापुरे,
पोहवा. प्रमोद नवले,पोना. राजू मोमीन,पोना. मंगेश थिगळे,पोना. दिपक साबळे,पोशि. संदीप वारे,पोशि.अक्षय नवले,पोशि.अक्षय जावळे,
पोशि. प्रसन्न घाडगे यांनी केलेली आहे.