Saturday, March 28, 2020

नारायणगाव येथे आदेशाचे पालन न केल्याने बेकरी चालकावर गुन्हा दाखल

ग्राहक समाचार News Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
नारायणगाव प्रतिनिधी  : कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी खाजगी व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना चालू ठेवू नये असा आदेश जारी केला होता याआदेशाचे पालन न केल्याने  बेकरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे
 सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
             दि.२८/०३/२o२० रोजी ११/३० वा.चे सुमारास मौजे नारायणगाव गावचे हद्दीत जुन्नर रोड येथे सुभाष बेकरीमध्ये योगेश सुभाष मते वय २८ वर्षे रा.खेबडे आळी,जुन्नर रोड नारायणगाव याने मा.जिल्हाधिकारी.पुणे यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक पुणे क्र.जि.आ.व्य/का.वि/१३८/२०२० पुणे दि.१८/०३/२०२० अन्वये दि.३१/०३/२०२० रोजी पर्यत पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू नये व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना कार्यरत ठेवू नये याबाबत आदेश जारी करण्यात आलेला असताना देखिल आरोपी योगेश मते याने  आपले सुभाष बेकरी नावाचे  दुकान उघडून १o ते १५ लोक ( गिऱ्हाईक ) यांना एकत्र जमून  विक्री करीत असताना मिळून आल्याने संतोष अंकुश दुपारगुडे पो कॉ १३४४ नेमणुक नारायणगाव पो स्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा द वि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
    

Friday, March 27, 2020

नारायणगाव पोलीस स्टेशन येथे संचारबंदीचा भंग करणाऱ्या ४ इसमांवर गुन्हा दाखल

    ग्राहक समाचार News portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ) कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

नारायणगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून या आदेशाला झुगारून नारायणगाव येथे संचारबंदीचा भंग करणाऱ्या ४ इसमांवर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणगाव 
पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सकाळी ६: ०० वा सुमारास संचारबंदी अनुशंघाने स.पो.नि.घोडेपाटील, पो. हवालदार कोकणे,पो. कॉ. गारगोटे,पो.कॉ. सांळूखे हे नारायणगावामध्ये पेट्रोलींग करित असताना  १) राजेंद्र अशोक भिसे रा येडगाव ता.जुन्नर, जि. पुणे २) महेश रामदास वाणी रा. हनुमान चौक. ता. जुन्नर जि. पुणे,३) प्रणव उत्तम दोंदे रा. खोडदरोड ना.गाव ता.जुन्नर जि.पुणे ४) विवेक बाजीराव मानव रा.ना.गाव ता.जुन्नर जि. पुणे हे संचार बंदीचा आदेश झुगारून विनाकारण फिरताना दिसून आल्याने त्यांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता मॉर्निग वॉकला आलोय, सहज फिरतोय, असेच आलोय अशी उत्तरे दिल्याने त्यांनी संचार बंदीचा आदेश झुगारून विनाकारण फिरताना मिळून आले असल्याने त्याच्या विरूध्द भा.द.वि.का.कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल 
करण्यात आला आहे.
               याबाबत पो.कॉ. योगेश गारगोटे यांनी फिर्याद दिली असून पुढील अधिक तपास  स.फौ.
ढमाले पो.ना. कोबल हे करित आहेत.

नारायणगाव पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
             नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, अत्यावश्यक वस्तु ची खरेदी करण्यासाठी फक्त एक इसमांने बाहेर पडावे, अत्यावश्यक सेवा बाबत फोन करून घरपोच सेवा उपलब्ध आहे  त्याचा लाभ घ्यावा, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे न केल्यास कायदेशिर कारवाई होवून गुन्हे दाखल करण्यात येईल. असे नारायणगाव पोलीस स्टेशन चे स.पो. नि.घोडेपाटील यांनी सांगितले.

Friday, March 20, 2020

जमावबंदी चा आदेश न पाळल्याने नारायणगाव येथे कोठारी व्हील्स या शोरूम वर कारवाई

ग्राहक समाचार News : Web portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक - श्री. अमर भागवत
नारायणगाव |  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी चा आदेश असताना देखील नारायणगाव येथील कोठारी व्हील्स हे शोरूम सुरू ठेवून ग्राहकांची गर्दी जमवून त्यांना गाड्यांची विक्री व दुरुस्ती करून देत असल्याने या शोरूमच्या दोन मॅनेजर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
       दि 20/03/2020 रोजी स 10.30. वा
 नारायणगाव येथे  नरेन्द्र शरदचंद्र करंदीकर  (असि. जुनरल कोठारी व्हिल्स ) हा प्रवीण दिवेकर (व्हाईस चेअरमन कोठारी व्हिल्स रा . पुणे) यांच्या परवानगीने कोठारी व्हिल्स नावाचे  मारुती सुझुकी शोरूम चालू ठेऊन त्यामध्ये लोकांची गर्दी जमवून  तसेच आपल्या शोरूम मधील कामगारांना  एकत्र जमवून शोरूम मधील गाड्यांची विक्री व दुरुस्ती करीत असताना मिळून आला म्हणून त्याने मा . जिल्हाधिकारी यांचा  कार्यालयीन आदेश क्रमांक पुणे क . जि. आ .व्य/का वि/138/2020 या  आदेशाचा अवमान केला म्हणून
 1) नरेंद्र शरदचंद्र करंदीकर वय 55 वर्षे धंदा असि. जनरलल मॅनेजर कोठारी व्हिल्स,रा वारूळवाडी ता. जुन्नर जि पुणे 2) प्रवीण दिवेकर व्हाईस चेअरमन कोठारी व्हिल्स रा पुणे यांचे विरुद्ध भा. द. वि. कलम 188 प्रमाणे  सरकारतर्फे कायदेशीर तक्रार असल्याने दिनेश दत्तात्रय साबळे पोलीस कॉ. नेमणूक नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Sunday, March 15, 2020

प्रा.अशफाक पटेल यांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा "पत्रकार सन्मान २०२०" पुरस्कार प्रदान

ग्राहक समाचार News  Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यसपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
नारायणगाव :  शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यात पत्रकार क्षेत्रांत कार्यरत असणारे प्रा.अशफाक दिलावर पटेल यांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, पुणे जिल्हा यांचा "पत्रकारिता सन्मान २०२०" पुरस्कार प्रतिष्ठानच्या भव्य शिवजयंती सोहळ्यात (दि.१२) मार्च रोजी नारायणगाव येथे आमदार महेश लांडगे, शिवव्याख्याते नितीन बानगुडे, यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटे, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, कुलस्वामी संस्थेचे उपाध्यक्ष  संतोष चव्हाण, संचालक भास्कर डोके, मुंबई बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, कारखान्याचे संचालक संतोष खैरे, निलायम ग्रुपचे संजय वारुळे, धर्मेंद्र गुंजाळ, अनिल खैरे, समिर इनामदार यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.अशफाक पटेल हे सजग टाईम्स न्यूज या वर्तमानपत्राचे संस्थापक, संपादक तर शिवनेर प्राईम चॅनेलचे मुख्य संपादक असुन या माध्यमातुन पत्रकारिता क्षेत्रांत कार्यरत आहेत. याचबरोबर युवा शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असुन सामाजिक क्षेत्रांत ही संस्था कार्यरत आहेत. तसेच अखिल मराठी युवा पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष असुन पत्रकारांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यक्रम व पत्रकार संरक्षणासाठी ते कार्यरत आहेत.

Sunday, March 8, 2020

निमगाव सावामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

ग्राहक समाचार ( अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ )
कार्यकारी संपादक : श्री.अमर भागवत

       श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान निमगाव सावा ता. जुन्नर जि. पुणे ही सामाजिक संस्था  रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेकडून नेहमीच सेवाभावी वृत्तीने  इफ्तार पार्टी, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे,वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी गौरव, सामुदायिक विवाह सोहळा असे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेकडून राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. 
      याप्रसंगी सौ. राजश्रीताई बेनके संचालिका श्रीराम पतसंस्था नारायणगाव, सौ. अनघाताई घोडके सदस्या पंचायत समिती जुन्नर, मा.शरदराव लेंडे गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस, पांडुरंग पवार मा उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य जि. प. पुणे, प्राचार्य डॉ. विलास जोशी,सचिव गणपत घोडे  हे मान्यवर उपस्थित होते. 
     आशाताई जाधव सरपंच जाधववाडी, सौ. सुप्रिया वाघ सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी, सौ. चंदाताई गाडगे संस्थापिका  सारिका पवार पतसंस्था, सौ. अनघाताई घोडके सदस्य पंचायत समिती जुन्नर,राजश्रीताई बेनके  मा. पांडुरंग पवार, शरदराव लेंडे, यांनी मनोगते व्यक्त केली. 
    बेल्हे , गुंजाळवाडी, साकोरी, नळावणे, शिंदेवाडी, आणे, रानमळा, गुळुंचवाडी, मंगरूळ बांगरवाडी, तांबेवाडी, निमगाव सावा, राजुरी पारगाव, आळे, औरंगपूर, कोंबरवाडी,उंचखडक पेमदारा पिंपरी कावळ, जाधववाडी, सुलतानपूर, नारायणगाव या विविध गावातून 77 कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या. त्यांचे संस्थेच्या वतीने सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी निमगाव सावा आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, पदाधिकारी,ग्रामस्थ, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी संस्थेकडून सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. छाया चक्कर, प्रास्तविक प्रा. ज्योती अहिनवे, प्रा. रविना तांबडे, आणि प्रा. सुप्रिया सासवडे यांनी आभार मानले.

Saturday, March 7, 2020

'नारी तू विश्व कल्याणी' (जागतिक महिला दिनानिमित्त संगीता दि.जाधेकर यांची कविता)

'नारी तू विश्व कल्याणी'
ग्राहक समाचार  News / Web Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)  कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
         
            'नारी तू विश्व कल्याणी' 
या विश्वाचे कल्याण करणे
     सर्वस्वी तुझ्या हाती आहे ||
 पण तू अबला हे मनी बिंबवून 
     तुझ्यातील बळ शोषलं आहे ||
 तू मर्दानी आहेस म्हणूनी
      भारत मातेचा जय आहे ||
तु दुर्गा तु लक्ष्मी
       तू विद्येचे दैवत आहे ||
 कितीही असुदे बलाढ्य मोठा
       नमुनी शक्ती मागतसे ||
 दीपोत्सवा मध्ये पूजती तुझंसी
       भीक धनाची मागतसे ||
 या दुनियेच्या बाजारामध्ये
      पैशाने सारे मिळत रे ||
निस्वार्थपणे न मिळे बघ 
      प्रेम आपल्या मातेचे ||
 नसो कुणाचा आधार तरीही
     वाढवते ती बछड्यांना ||
 मन मोठे त्या स्त्री शक्तीचे
     शक्य नसे जे पुरुषांना ||
खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी
      कमी लेखती महिलांना ||
 कुठेही कमी  नाहीच आम्ही
      दाखवून देती जगाला ||
 व्रत - वैकल्ये उपास-तापास
      सर्व परिवाराच्या सुखाला ||
 दुखले खुपले कधीही कुणाचे
      जागरण तिच्याच नशिबाला ||
 खंत असे ही स्त्री जन्माला 
      अनामिक ही भीती तिला ||
चरित्रवान परी निर्भय नाही
       शिकार मिळेल नर लांडग्यांना ||
 ह्या भीतीने स्त्रीजन्माचे 
       स्वागत नाकारीते दुनिया ||
 तरीही टाकिती पाऊल पुढंती 
      नसे कशाचे बंधन तिला ||
 जसे जिजाऊने घडविले शिवाजी
      कशी करावी पिढी पुढे ||
माय भगिनींचे शिल रक्षावे
      अशी उजवावी शिलवंत मुले ||
वंदे मातरम गायन होईल 
       सार्थक शिवशक्तीचे ||
भारत माता की जय होईल 
       महासत्ता भूषण देशाचे ||
______________________________________
               सौ संगीता दि. जाधेकर
            नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे          मोबा.9960690596

Wednesday, March 4, 2020

शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा सत्यशिल शेरकर यांची बिनविरोध निवड.

ग्राहक समाचार News/ Web Portal
           ( अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ )
           कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत

  ( अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांचा सत्कार करताना संस्थेचे आजी-माजी संचालक, सभासद व ग्रामस्थ . )
 
 शिरोली बु. (०४ मार्च)  जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक पंचक्रोशीतील दहा गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एकमेव  शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सत्यशिल शेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती अध्यासी अधिकारी एन.आर.धोंगडे यांनी दिली.
        संस्थेची २०२०-२५ ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून त्यामध्ये सभासदांचा सत्यशिल शेरकर यांच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. आज (दि.०४) सहकारनगर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक अध्यासी अधिकारी एन.आर.धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
        अध्यक्ष पदाकरीता सत्यशिल शेरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. अध्यक्ष पदासाठी शेरकर यांच्या नावाची सूचना संचालक अनिल गणपत मांडे यांनी मांडली व त्यास अनुमोदन संचालक शिवाजी हरिभाऊ डोके यांनी दिले. एकच अर्ज असल्याने अध्यक्षपदी सत्यशिल शेरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी एन.आर.धोंगडे यांनी जाहीर केले.
        यावेळी बोलताना शेरकर म्हणाले की, सर्व १० गावातील सभासदांनी मी व माझे सहकारी संचालकांवर विश्वास दाखवून, शेतकरी वर्गाची काळजी घेणारे संचालक बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे व निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. ह्यावेळी संस्थेचे सर्व आजी-माजी संचालक, सभासद, ग्रामस्थ, मुख्य हिशोबनीस डी.आर.काचळे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 श्री निवृत्तीशेठ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचीही निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. अध्यासी अधिकारी इ.डी.माळवे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नवनिविर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी १-१ अर्ज आल्याने अध्यक्षपदी गणेश राऊत तर उपाध्यक्षपदी संतोष शेरकर यांची निवड झाली.



Monday, March 2, 2020

पिस्टलच्या धाकाने हवेत गोळीबार करून तरुणीस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

ग्राहक समाचार News/portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : अमर भागवत

                  एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने भर रस्त्यात हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ नंबर जवळील जांबुत फाटा येथे घडली आहे.  तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
             अक्षय भाऊसाहेब दंडवते (रा. वाफगाव, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
            नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१/३/२०२० रोजी सायंकाळी  ०६:०० वा. च्या सुमारास येडगाव गावचे हद्दीत जांबुत फाटा ता जुन्नर जि पुणे येथे यातील फिर्यादी तरुणी सूर्या पोलीस अकॅडमी आळेफाटा येथून प्रशिक्षणावरून घरी जात असताना आरोपी
 अक्षय याने त्याच्या एफ झेड मोटारसायकल नंबर एम एच 12/एल बी 2546  वरून तरुणीचा पाठलाग करून तीस थांबवून मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तरुणीने मी बोलणार नाही असे म्हटले व तिने तिच्या आईला फोन लावत असताना आरोपी अक्षय याने जर्किंग मधून कंबरेला खवलेले पिस्टल काढुन त्यातील एक गोळी जमिनीवर झाडली व नंतर तरुणीच्या उजव्या हाताला धरून तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पिस्टल लावून पिस्टल मधून 5 ते 6 वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न करून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांतही भिती भरली होती. 
याची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला.यावेळी तरुण नाशिक येथे पळून जात असताना त्याला आळेफाटा भागात नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, पोलीस कर्मचारी सचिन कोबल, वाघमारे, गारगोटे ,पालवे, लोहोटे, पठारे यांनी 2 तासात ताब्यात घेतले आहे.

Sunday, March 1, 2020

नाणेघाट येथे पर्यटकांना राहण्यासाठी जंगलकॅंम्पचे उद्घाटन

ग्राहक समाचार News /Web Portal
     (अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ )
  कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
                 जुन्नर :  जुन्नर तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागातील पर्यटन स्थळ म्हणून उदयास आलेल्या नाणेघाट येथील उभारण्यात आलेल्या जंगल कॅम्प हाऊसचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
जंगल कॅम्प ची उभारणी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर यांच्या संकल्पनेतून व संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघर च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
              याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी येणाऱ्या काळामध्ये किल्ले जीवधन व नाणेघाट च्या विकासासाठी ठोस पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले. येणाऱ्या काळात जंगल कॅंम्पच्या माध्यमातून घाटघर येथील ग्रामस्थांना व तरुणांना विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून येथील शेतात पिकत असलेल्या मालाला बाजारपेठ सुध्दा उपलब्ध होणार आहे.
                    या प्रसंगी उपवनसंरक्षक जयरामे गौडा, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, किरण कबाडी, सुजित खैरे, कुमार गाडेकर, संजय साखला, भाऊ देवाडे, राहुल गावडे, बाळासाहेब शिंदे, कुमार शिंगाडे, पोपट रावते, नंदू पानसरे, यश मस्करे, अशोक लांडे, उपसरपंच बुधा बुळे, विनायक खोत, वनपाल शिवाजी सोनवणे, शशिकांत मडके, वनकर्मचारी, घाटघर येथील ग्रामस्थ तसेच मान्यवर उपस्थित होते.
           या ठिकाणी पाच टेंटची उभारणी करण्यात आली असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटन प्रेमींना येथे राहण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. एका टेन्टमध्ये चार बेड लावण्यात आले असून टेन्टमध्ये टॉयलेटच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रती टेंट रू. 2000/- एक रात्रीचे शुल्क आकारण्यात येणार असून याच माध्यमातून वनविकास व गाव विकासाचे ध्येय साध्य होणार आहे व तरुणांना यातूनच रोजगार दिला जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक खोत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले. तर आभार अशोक लांडे यांनी मानले.

सकारात्मक विचारामुळे तनावमुक्त जीवन बनु शकते - ब्र. कु. भगवान भाई

ग्राहक समाचार News /Web Portal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
                   नारायणगांव (१ मार्च) सध्याच्या काळामध्ये जितक्या समस्या आहेत त्या सर्वांचे कारण आहे नकारात्मक विचार, नकारात्मक विचारामुळे तनाव वाढतो. तनाव मुक्त होण्यासाठी सकारात्मक विचारांची फार गरज आहे. सकारात्मक विचारामुळे तनाव मुक्त जीवन बनु शकते. अशी माहीती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट आबूहून आलेले ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी सांगितली. नारायणगांव सेवाकेंद्र येथे ते बोलत होते.
           ब्र. कु. भगवान भाई म्हणाले की १९ वे शतक हे अन्दाजचे होते, २० वे शतक हे प्रगतीचे आहे, आणि २१ वे शतक हे तनावपूर्ण असेल.अशा तनावपूर्ण परिस्थितितुन बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. त्यांनी सांगितले की मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतील तर विचारांची गती वाढते आणि त्यामुळे मेंदूमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ तयार होऊन आजार वाढतात. मनाच्या नकारात्मक विचारामुळे मनोबल, आत्मबल कमजोर होत जाते. जिथे तणाव आहे तिथे समस्या वाढतच जातात, तनावामुळेच आपापसात मतभेद वाढतात. तणावामुळे मानसिक अशांती वाढते आणि मनुष्य व्यसनाधीन होतो. 
              तसेच नकारात्मक विचारामुळे मनामध्ये घृणा, तिरस्कार, क्रोध तयार होतो. याच्यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले की आध्यात्मिक ज्ञान हे सकारात्मक विचारांचा स्रोत आहे.    सध्याच्या काळात मनुष्य स्वतःला, पिता परमेश्वराला, कर्माच्या गुह्य गतीला विसरल्यामुळे मुनुष्याच्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून सुध्दा नकारात्मक विचार येऊ लागतात. मनाला सकारात्मक विचारांची दिशा देण्यासाठी स्वतःला आत्मा समजून पिता परमेश्वराची मन बुद्धी ने आठवण करून त्याच्या गुणांचे गुणगान केले पाहिजे तसेच स्वतःविषयी, परिस्थिती विषयी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
               स्थानिक सेवाकेंद्र संचालिका बि. के. संगीता बहेनजी यांनी सांगितले की रोज राजयोगाचा अभ्यास आणि सकारात्मक ज्ञान यांच्याद्वारे आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत तणावापासून मुक्त राहू शकतो.
            याप्रसंगी नारायणगाव प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वतीने भगवान भाई यांचा सत्कार करण्यात आला.
  या वेळी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाचे भाई - बहेन व सर्व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.