ग्राहक समाचार : News portal
कार्यकारी संपादक: श्री. अमर भागवत
नारायणगाव | चारित्र्याचा संशय घेऊन पतीने चार महिने गर्भवती असलेल्या आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी दि. ०६ रोजी दुपारी ३ – ५ या दरम्यान कांदळी ता. जुन्नर येथील उबरकास मळा येथे घडली.
कविता संजय फुलमाळी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विवाहितेचे वडील श्याम माळी हे कांदळी येथील उबरकास मळा येथे वाट्याने शेती करीत आहेत. त्यांच्याच शेजारी त्यांचा जावई संजय फुलमाळी व मुलगी कविता राहत होते. काल दिनांक ६ रोजी दुपारी तीन वाजता मका कापण्यासाठी गेलेली कविता बराच वेळ झाला तरी परत कशी आली नाही याचा शोधाशोध घेत असताना कांदळी येथील विशाल सुदाम कुतळ यांच्या मालकीच्या उसाच्या शेतामध्ये तिचा मृतदेह आढळला. या मृतदेहाजवळ एक चिट्ठी, तंबाखू व चुन्याची पुडी आढळून आली. चिट्ठी लिहिलेला कागद हा संशयित आरोपी कविताचा पती संजय याच्या घरात सापडलेल्या वहीचाच असल्याने पोलिसांचा संशय बळावला. आरोपी संजय याची देहबोली व विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उलटसुलट उत्तरे यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला व पोलिसी खाक्या दाखवताच संजय यांनी खुनाची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहेत.
No comments:
Post a Comment