Pages

Thursday, May 21, 2020

तमाशा फडमालकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी

ग्राहक समाचार News Portal
【अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ】
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
(अध्यक्ष - अ. भा. ग्राहक संरक्षण समिती जुन्नर तालुका)
पुणे - लॉकडाऊनमुळे संपूर्ण हंगाम बुडाल्याने अडचणीत आलेल्या तमाशा फडमालकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत केली.
               कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाट्य, चित्रपट व मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान डॉ. कोल्हे यांनी ही मागणी केली. ते पुढे म्हणाले की, तमाशा व्यवसायाचा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या काळात यात्रा-उत्सवांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तमाशा कार्यक्रमातून फंडांचा वर्षभराचा खर्च भागवला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या यात्रा-उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे तमाशाचा संपूर्ण हंगाम बुडाला. परिणामी तमाशाचे फड, त्यात काम करणारे कलावंत त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे, याकडे डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.
                     आर्थिक अडचणीत असलेल्या फडमालकांना आर्थिक आधार दिला नाही तर महाराष्ट्राची परंपरा असलेली ही लोककला धोक्यात येईल अशी भीतीही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक संपताच फडमालकांना विनातारण कर्ज देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले.

No comments:

Post a Comment